जुन्या आठवणी.




जुन्या आठवणी आठवल्या आज ..
अचानकच. 
ओठांना अश्रूंनी भिजवून गेल्या. 

वय झालय आता..
ह्याची जाणीव तर होतीच 
पण वाढत्या वयाबरोबर,
मागे काय काय सुटलं 
ह्याची जाणीव झाली,
नव्याने. 

पान उलटलं की लिहिलेलं नजरेआड होतं,
पण ते असतंच नजरेआड गेलेल्या पानावर कोरलेलं
वेळ निघून गेली की -
सर्व काही नाहीसं होईल असं वाटतं खरं  ..
पण ते असतं मनाच्या कोपऱ्यात घर करून राहिलेलं ..
ह्याची प्रचिती आली. 

जुन्या आठवणी आठवल्या आज..
अचानकच. 
हृदयाचा ठोका चुकवून गेल्या. 

पुन्हा जुन्या दिवसात हरवून जावंसं वाटलं,
डोळे बंद करून 
मस्त जुनी गाणी ऐकावीशी वाटली,
वय झालय आता ..
क्षणभर विसरावंसं वाटलं. 
पुन्हा पान उलटून -
लिहिलेलं वाचावंसं वाटलं.

जुन्या आठवणी आठवल्या आज ..
अचानकच. 
अश्रूंनी भिजलेल्या ओठांवर
क्षणभर गोड हसू सोडून गेल्या.



Return to Main Page




~ Survivor ~ Ongoing series on You Me & Stories