आज आवर्जून तुझी आठवण आली...
🌸 आज आवर्जून तुझी आठवण आली... 🌸 (२०.०९.२०२६) आज आवर्जून तुझी आठवण आली, पण डोळ्यांत अश्रू दाटले नाहीत. चेहऱ्यावर दुःखाचे सावट नव्हते, आणि मनही खिन्न झाले नाही... ओठांवर एक निखळ हसू होते, मनात गोड आठवणींचा आनंद होता… कारण – आज मला माझा तो वाढदिवस आठवला, जेव्हा तू मला पहिल्यांदाच गुलाबाचे फूल दिले होतेस. वाढदिवस साजरा करायला न आवडणाऱ्या वडिलांनी – माझ्यासाठी खास मागवून गुलाबाचे फूल दिले; ही फार मोठी गोष्ट होती माझ्यासाठी... कायम स्मरणात राहणारी..! आज तू नाहीस, पण त्या गुलाबाच्या फुलाचा सुगंध अजूनही मनात तसाच दरवळतोय… आज तुझी आठवण आली, सोबत कोणतेही दुःख न आणता. यालाच म्हणतात बहुतेक – “एखाद्याच्या आठवणीत जिवंत राहणं!” दुःख हळूहळू कमी होत नाहीसे होते, पण आठवण मात्र तशीच राहते... कायमची. आणि म्हणूनच, अश्रूंची जागा स्मितहास्य घेते..! असाच राहशील तू कायम आठवणीत माझ्या – मला पुढे जगण्याचं बळ देत.