सूर्य उगवायला थोडेच क्षण बाकी असतात तेव्हा मी झोपते
झोपताना विचार करते -
"काहीतरी हरवलं आहे"
उठल्यावर पुन्हा आठवतात -
तेच झोपण्या आधीचे विचार...
"काहीतरी हरवलं आहे"
दिवस सुरु होतो ...
कामं सुरु होतात -
क्षण येतात - क्षण जातात ...
पण मनातला विचार जात नाही -
"काहीतरी हरवलं आहे"
ह्याला खुश ठेवते ...
त्याचे डोळे पुसते,
मन पुन्हा म्हणतं -
"काहीतरी हरवलं आहे"
जेवते मी,
काम करते
दोन क्षण बसून खुर्चीवर
पुन्हा विचार करते -
"काहीतरी हरवलं आहे"
सूर्य मावळतो...
चंद्र उगवतो,
पण विचार मावळत नाहीत
उत्तर सापडत नाही -
"काहीतरी हरवलं आहे"
पण काय?
रात्रभर विचार करते...
बिछान्यात पडून राहते,
डोळे बंद करते...
कूस बदलते -
"काहीतरी हरवलं आहे"
डोळे उघडते ...
डोळ्यातून एक अश्रू बाहेर येऊन म्हणतो -
"माझ्याकडे का पाहत नाहीस?
मला तुझा जरा हे वेळ देत नाहीस...
पहा तरी स्वतः कडे...
आरश्यासमोर उभी रहा -
अनोळखी चेहरा दिसेल,
तुला पाहून हसेल,
त्याच्या हास्याकडे पहा…
तुला कळेल -
काय हरवलं आहे ते समजेल.
उठते …
आरश्यासमोर जाते…
अनोळखी चेहरा हसतो मला पाहून,
मन माझे येते गहिवरून,
कळतं मला काय हरवलं आहे ...
जगण्याच्या नादात
आयुष्यच हरवलं आहे
दुसऱ्याच्या नादात
स्वतःचं अस्तित्व हरवलं आहे.
खरंच -
काहीतरी नाही...
खूप काही हरवलं आहे.
Return to Main Page

