काहीतरी हरवलंय...


सूर्य उगवायला काहीच तास असतात तेव्हा मी झोपते
झोपताना विचार करते -
"काहीतरी हरवलंय"
उठते तेव्हां पुन्हा आठवतात ... तेच रात्रीचे विचार
"काहीतरी हरवलंय"

दिवस सुरु होतो ... कामं सुरु होतात
क्षण येतात ... क्षण जातात
पण मनातला विचार जात नाही
"काहीतरी हरवलंय"
ह्याला खूष ठेवते ... त्याचे डोळे पुसते
मन पुन्हा म्हणतं - "काहीतरी हरवलंय"
जेवते मी ... काम करते
दोन क्षण बसून खुर्चीवर पुन्हा विचार करते
"काहीतरी हरवलंय"

सूर्य मावळतो ... चंद्र उगवतो
पण विचार मावळत नाही
उत्तर सापडत नाही
"काहीतरी हरवलंय" ... पण काय?
रात्रभर विचार करते ... बिछान्यात पडून राहते ...
डोळे बंद करते ... कूस बदलते
"काहीतरी हरवलंय"

डोळे उघडते
डोळ्यातून एक अश्रू बाहेर येऊन म्हणतो
"माझ्याकडे का पाहत नाहीस?
मला तुझा जरा ही वेळ देत नाहीस ...
पहा तरी स्वतः कडे
आरश्यासमोर उभी राहा ...
अनोळखी चेहरा दिसेल ... तुला पाहून हसेल
त्याच्या हास्याकडे पहा, तुला कळेल ...
काय हरवलंय ते समजेल."

उठते ...
आरश्यासमोर जाते ...
अनोळखी चेहरा हसतो मला पाहून
मन माझे जाते भारावून
कळते मला काय हरवलंय...

जगण्याच्या नादात आयुष्यच हरवलंय
दुसऱ्यांच्या नादात स्वतःचं अस्तित्व हरवलंय
खरंच
काहीतरी नाही, खूप काही हरवलंय.