बीज अपेक्षेचं...
एक बीज अपेक्षेचं मनात रुजलं
विचारांचं त्याला खत दिलं
प्रेमाची उब दिली
आणि डोळ्यातलं पाणी दिलं

अपेक्षेला पालवी फूटली
मूळ त्याचं हृदयात खोलवर पोहोचलं

अपेक्षेचं रोप वाढत गेलं
पालवी त्याची मनभर पसरली
कळी आली, उमलली, सुगंध दरवळला
मनाच्या कोपऱ्या - कोपऱ्यात पसरला
अपेक्षेच्या फुलाचे सौंदर्य मात्र काही क्षणांसाठीच राहिलं
नियमच तसा होता...

उमललेली कळी कधी न कधी कोमेजून जाणारच होती
कळ्या आल्या, उमलल्या, कोमेजून गेल्या
रोप मात्र तसचं वाढत राहिलं -
रोपाचं वृक्ष झालं
त्याला फळे आली 
अपेक्षेचं फळ पिकण्यापूर्वी मात्र त्याला अहंकाराची कीड लागली
एका पाटोपाट एक, अशी सगळी फळे हळू हळू नष्ट होऊ लागली

परिस्थितीचं वादळ आलं, वृक्ष पूर्ण नष्ट झालं
वाळवंटातल्या वृक्षाप्रमाणे दिसू लागलं
शेवट जवळ आला हे लक्षात येताच
भंग होत असलेल्या अपेक्षेच्या वृक्षाने हळूच एक बीज पुन्हा मनात रुजवलं

त्या नवीन रुजलेल्या बीजाला मात्र -
पुन्हा खत, उब, पाणी मिळेल का?
त्याला ही पुन्हा पालवी फुटेल का?
मूळ त्याचं हृदयात खोलवर जाईल का?
त्या अपेक्षेच्या रोपाचं रुपांतर पुन्हा वृक्षात होऊन
त्याला पुन्हा फळे येतील का?