आज आवर्जून तुझी आठवण आली...




🌸 आज आवर्जून तुझी आठवण आली... 🌸
(२०.०९.२०२६)

आज आवर्जून तुझी आठवण आली,
पण डोळ्यांत अश्रू दाटले नाहीत.
चेहऱ्यावर दुःखाचे सावट नव्हते,
आणि मनही खिन्न झाले नाही...

ओठांवर एक निखळ हसू होते,
मनात गोड आठवणींचा आनंद होता…
कारण –
आज मला माझा तो वाढदिवस आठवला,
जेव्हा तू मला पहिल्यांदाच गुलाबाचे फूल दिले होतेस.
वाढदिवस साजरा करायला न आवडणाऱ्या वडिलांनी –
माझ्यासाठी खास मागवून गुलाबाचे फूल दिले;
ही फार मोठी गोष्ट होती माझ्यासाठी...
कायम स्मरणात राहणारी..!

आज तू नाहीस,
पण त्या गुलाबाच्या फुलाचा सुगंध
अजूनही मनात तसाच दरवळतोय…

आज तुझी आठवण आली,
सोबत कोणतेही दुःख न आणता.
यालाच म्हणतात बहुतेक –
“एखाद्याच्या आठवणीत जिवंत राहणं!”

दुःख हळूहळू कमी होत नाहीसे होते,
पण आठवण मात्र तशीच राहते... 
कायमची.
आणि म्हणूनच, 
अश्रूंची जागा स्मितहास्य घेते..!
असाच राहशील तू कायम आठवणीत माझ्या –
मला पुढे जगण्याचं बळ देत.

Comments